मुंबई: सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेल्या लोकांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आर्केस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, ही सवलत केवळ बंदिस्त किंवा इनडोअर आस्थापनांसाठीच लागू असेल. खुल्या जागा, टेरेस किंवा मोकळ्या मैदानावरील सेलिब्रेशनला ही वेळ मर्यादा लागू असणार नाही. त्यामुळे बंदिस्त हॉल किंवा हॉटेल्समध्ये नागरिकांना पहाटेपर्यंत जल्लोष करता येणार आहे.
सुरक्षेसाठी पोलिसांचा 'तगडा' बंदोबस्त
या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नाक्या-नाक्यावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेषतः 'ड्रंक अँड ड्राईव्ह' आणि अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची विशेष करडी नजर असणार आहे.
"नागरिकांनी उत्साहात आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करावे, मात्र कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल." — मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई